Russia-Ukraine War : दुसऱ्या विश्वयुद्धानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणारं युद्ध हे जगातील सर्वाधिक काळासाठी सुरू असणारं युद्ध ठरत असून, आतापर्यंत या युद्धात हजारोंचा बळी गेला आहे तर, अब्जावधींची रक्कम खर्च करण्यात आली आहे. देशोदेशिच्या नेतेमंडळींनी या युद्धात सामंजस्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पण, ते सपशेल अपयशी ठरले. त्यातच आता रशियावर इतके गंभीर आरोप लावण्यात येत आहेत, की जागतिक स्तरावर या देशाकडे पाहण्याचा अनेकांचाच दृष्टीकोन बदलला आहे.
ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या नेत्यांनी पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला केलेल्या प्रश्नामुळं या विषयाला चालना मिळाली. रशिया युक्रेन युद्धबंदीदरम्यानच्या चर्चांमध्ये आता त्या 19556 मुलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या घरवापसीचा उल्लेख करण्यात आला आहे का? हा प्रश्न उपस्थित करत ही तिच मुलं आहेत ज्यांचं रशियाच्या लष्करानं युद्धादरम्यान अपहरण केलं होतं हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
हजारो युक्रेनी मुलांच्या अपहरणाचा मुद्दा वैश्विक पातळीवर चर्चेचा विषय ठरत असतानाच जोपर्यंत या मुलांना रशियाकडून सुरक्षितरित्या परत पाठवलं जात नाही, तोपर्यंत युद्धबंदीसंदर्भात कोणतीही चर्चा होणार नसल्याचं ब्रिटनच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.
BBC च्या वृत्तानुसार ब्रिटनच्या संसदेतील चर्चेदरम्यान जोहाना बॅस्टर यांनी रशिया आणि युक्रेन मुद्द्यावरून पंतप्रधानांना हा प्रश्न केला. यावेळी त्यांनी रशियानं अपहरण केलेल्या 19556 मुलांचं काय झालं, त्यांना परत कोण आणि कसं आणणार हा प्रश्नही विचारला. त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना 'तुमचा रोष योग्यच आहे. या मुलांचं अपहरण करण्यात आलं असून त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली असेल. त्याशिवाय शांतता करार आणि युद्धबंदीसंदर्भातील चर्चा पुढे जाणार नाही', असं ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले.
युक्रेनच्या सरकारच्या मते 2022 मध्ये जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा युक्रेनच्या जवळपास 19500 मुलांना रशियानं पळवून नेलं. यापैकी जवळपास 388 मुलं आपल्या कुटुंबीयांकडे परती असून, या मुलाचं वय 3 ते 10 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. जागतिक स्तरावर खळबळ माजवणाऱ्या या आरोपांवर रशियानं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.