Israel Attack on Gaza Anas Al-Sharif: इस्रायलकडून गाझामध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये पाच पत्रकारांचा मृत्यू झाला असून यामध्ये कतारमधील वृत्तसंस्था अल जजीराच्या अनस अल शरीफ नावाच्या पत्रकाराचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार गाझा शहरानजीक असणाऱ्या अल शिफा रुग्णालयापाशी पत्रकारांसाठी उभारण्यात आलेल्या तळावर इस्रायलनं हल्ला चढवला, ज्यामध्ये या पत्रकारांचा मृत्यू ओढावला.
एफपीच्या नृत्तानुसार रविवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा गाझाच्या अल शिफा रुग्णालयाबाहेर झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अल जजीराचे प्रतिनिधी मोहम्मद करीकेह आणि कॅमेरामन इब्राहिम ताहीर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलीवा यांचाही मृत्यू ओढावला. इस्रायलच्या या हल्ल्यांसंदर्भात अल जजीराच्या अनस अल-शरीफ यांनी त्यांच्या अखेरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनं अनेकांच्याच नजरा वळवल्या.
‘माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचत असल्यास लक्षात घ्या, की इस्रायल मला ठार करण्यात आणि मला कायमचं शांत करण्यात यशस्वी झालं आहे. पण, गाझा... तुम्ही मला विसरु नका’, हे त्यांचे अखेरचे शब्द होते. गाझाच्या स्थानिक रुग्णालय प्रमुखांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीतसुद्धा या हल्ल्यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा देण्यात आला.
इस्रायल डिफेंस फोर्स अर्थात आयडीएफनं अनस यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला असून, इस्रायली मिलिटरीच्या बाजुनं सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार हमासचा दहशतवादी अनस अल शरीफ, ज्यांच्याकडून अल जजीराचा पत्रकार असल्याचा बनाव रचण्यात आला होता त्याचा खात्मा झाला आहे. अल शरीफ हमासच्या एका दहशतवादी गटाचा प्रमुख असल्याची माहिती देत त्यानं इस्रायली नागरिक आणि आयडीएफच्या सैनिकांवर रॉकेट हल्ले केल्याचा दावा केला.
STRUCK: Hamas terrorist Anas Al-Sharif, who posed as an Al Jazeera journalist
— Israel Defense Forces (@IDF) August 10, 2025
Al-Sharif was the head of a Hamas terrorist cell and advanced rocket attacks on Israeli civilians and IDF troops.
Intelligence and documents from Gaza, including rosters, terrorist training lists and… pic.twitter.com/ypFaEYDHse
गाझामधून मिळालेली गोपनीय माहिती आणि तपशीलामध्ये रोस्टर, दहशतवादी प्रशिक्षण यादी, पगाराची यादी यांचा समावेश असून त्यावरुनच अनस हमासचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट होत असल्याचाही दावा करण्यात आला.
गाझामधील इस्रायलच्या हल्ल्यात कोणता पत्रकार मरण पावला?
गाझामधील इस्रायलच्या हल्ल्यात कतारमधील वृत्तसंस्था अल जजीराचा पत्रकार अनस अल-शरीफ यांच्यासह चार अन्य पत्रकारांचा मृत्यू झाला. यामध्ये मोहम्मद करीकेह (प्रतिनिधी), आणि कॅमेरामन इब्राहिम ताहीर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलीवा यांचा समावेश आहे.
हा हल्ला कुठे आणि केव्हा झाला?
हा हल्ला रविवारी, 10 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी उशिरा गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी उभारलेल्या तळावर झाला. या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला.
अनस अल-शरीफ कोण होते?
अनस अल-शरीफ हे 28 वर्षांचे अल जजीराचे पत्रकार होते, जे गाझाच्या उत्तर भागातून वारंवार बातम्या देत होते. ते अल जजीराच्या अरबी वृत्तवाहिनीचे प्रमुख प्रतिनिधी होते आणि 2018 मध्ये पॅलेस्टाईनमधील सर्वोत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्काराचे मानकरी होते.