Qatar Airways : विमान प्रवास... कैक मैलांचा प्रवास अगदी काही तासांवर आणण्याची मुभा या हवाई मार्गानं केल्या जाणाऱ्या प्रवासातून मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रवास प्रत्येक वेळी नवे अनुभव देणारा ठरतो. यावेळी मात्र एका जोडप्याला प्रतिष्ठीत विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून अगदीच भयावह अनुभव आला आणि त्यांच्या पायाखालजी जमीनच सरकली. त्यामागचं कारणही तसंच होतं. समजा, विमानातून प्रवास करताना आपल्या शेजारी डोक्यावरून चादर घेऊन बसलेली व्यक्ती हयात नसून तो मृतदेह आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं तर? धक्काच बसेल ना? काहीजण तर जागेवरून धाडकन उठून उभेच राहतील.
मेलबर्न ते दोहा रोखानं प्रवास करणाऱ्या एका जोडप्यानं या प्रवासासाठी कतार एअरवेज ही कंपनी निवडली होती. पण, त्यांनी मोठ्या विश्वासानं निवडलेली हीच सुविधा संपूर्ण प्रवासात त्यांची डोकेदुखी वाढवण्यास कारणीभूत ठरली. कारण, इथं त्यांना चक्क एका मृतदेहाशेजारी बसून प्रवास करावा लागला. जे पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
मुळचं ऑस्ट्रेलियाचं जोडपं, मिशेल रिंग आणि जेनिफर कॉलिन यांनी व्हेनिसला जाण्यासाठीचा त्यांचा प्रवास सुरू केला. त्याचवेळी प्रवासाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान, प्रसाधगृहातून बाहेर पडतानाच एक महिला तिथंच कोसळली आणि तिथंच तिनं प्राण सोडले. BBC ला दिलेल्या माहतीनुसार तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. पण, या एका घटनेनं विमानात खळबळ माजली. पुढचा धक्का तर ते पचवूच शकले नाहीत कारण, केबिन क्रूनं या मृत महिलेला तिथून दुसऱ्या ठिकाणी नेणं कठीण असल्यामुळं रिंग आणि कॉलिन यांच्याशेजारीच असणाऱ्या सीटवर बसवलं आणि या मृतदेहावर पांघरूण घातलं.
'तुम्ही थोडे सरकता का?' असं केबिन क्रूनं विचारताच रिंगनं हो... असं उत्तर दिलं आणि पुढच्याच क्षणाला महिलेचा मृतदेह त्यांच्या शेजारी आणून ठेवण्यात आला. विमानात इतर जागा रिकाम्या असतानाही हा मृतदेह अशा रितीनं ठेवल्याचं पाहून या दाम्पत्याला धक्काच बसला. मुळात या घटनेसाठी विमानसेवा देणारी कंपनी जबाबदार नसली तरीही काही गोष्टींसाठी काही नियमांचं पालन केलं जाणं अतिशय आवश्यक आहे आणि तेच नियम इथं दूरदूरपर्यंत पाहायला मिळाले नाहीत अशा शब्दांत या जोडप्यानं नाराजी व्यक्त केली.
अखेर विमान लँड झालं आणि प्रवाशांना आसनावरच थांबण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर तातडीनं वैद्यकिय चमू तिथं आला, मागोमाग पोलीसही विमानात दाखल झाले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीसाठी कतार एअरवेजनं माफी मागितली. पण, आपल्यापर्यंत कोणीही पोहोचलं नसल्याची माहिती या जोडप्यानं दिली. विमानप्रवासादरम्यान असे प्रसंग ओढावल्यास केबिन क्रूनं प्रसंग आणि परिस्थिती हाताळत सहप्रवाशांना यामुळं त्रास होणार नाही यासाठी काही निर्णय सावधगिरीनं घेतले पाहिजेत असाच सूर नेटकऱ्यांनी आळवला. प्रत्यक्षाचत विमान प्रवासादरम्या एका तिकीटासाठीसुद्धा मोठी रक्कम मोजली जाते. अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांची गैरसोय झाल्यास नाराजीचा सूर आणखीनच तीव्र होत जातो हे नाकारता येत नाही.