Space News : पृथ्वी.... जीवसृष्टीचं अस्तित्वं असणारा एकमेव ग्रह. पण, याच जीवसृष्टीनं केलेल्या काही कृत्यांमुळं त्यांना आसरा देणारा हा ग्रह आता धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही कधी मोकळ्या आकाशाकडे पाहिलं आहे का? पाहिलं असेल, तर या विस्तीर्ण आकाशाच्या पलिकडे काय आहे असा प्रश्न कधी पडला आहे?
असा प्रश्न पडत असेल, तर याचं उत्तर आहे, या विस्तीर्ण आकाशापलिकडे आहे ढिगानं तरंगणारा कचरा.... विश्वास बसत नाहीय? European Space Agency (ESA) नं या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची गरज असल्याचं म्हणत पृथ्वीच्या कक्षेमध्ये तरंगणाऱ्या प्रचंड कचऱ्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आता हा कचरा कोणता? तर, पृथ्वीच्या कक्षेत अनेक धातूच्या गोष्टी, अवकाशात राहिलेल्या यंत्रणा, उपग्रह, रॉकेटचे अवशेष आणि कैक दशकांपासून अनेक मोहिमांमधील कचरा तिथंच राहिला आहे.
एकट्या 2024 मध्ये जवळपास 1200 तत्सम उपकरणं आणि व्यर्थ गोष्टी, रिटायर्ड उपग्रह पृथ्वीच्याच वातावरणीय क्षेत्रात परतले असून, ते तिथंच तरंगत असल्याचं अंतराळ संशोधन संस्थेनं स्पष्ट केलं. व्यावसायित उपग्रहांची गर्दी आणि एकंदर सौरमालेची रचना पाहता या साऱ्याचा पृथ्वीच्या Low-Earth Orbit (LEO) अधिकाधिक परिणाम करताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला पृथ्वीच्या कक्षेभोवती साधारण सेंटीमीटर रुंदीच्या भागात 1.2 million वस्तू तरंगत असून, अंतराळातील या कचऱ्यामुळं सक्रिय असणाऱ्या उपग्रहांनासुद्धा धोका निर्माण करत आहेत. इतकंच नव्हे, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उध्वस्त करण्याची क्षमता या वस्तूंमध्ये असल्याची भीतीसुद्धा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
आजच्या क्षणाला सर्व अवकाश मोहिमा थांबवल्या तरीही ही भीती इथंच थांबणार नाही असंच इएसएच्या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. कारण, सध्याच्या घडीला तिथं तरंगणाऱ्या वस्तू अधिक वेगानं फिरत असून, त्या पृथ्वीवर कोसळण्याच्याही स्थितीत आहेत. अवकाशातील हा कचरा फक्त पृथ्वीपुरता सीमित राहत नसून, ही समस्या चंद्रापर्यंतसुद्धा अडचणी वाढवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
2010 मध्ये जिथं अवकाशातील हा कचरा पृथ्वीवर कोसळण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं तिथंच हल्ली मात्र हे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढल्याचं लक्षात येत आहे. यावर तोडगा म्हणजे हा कचरा हटवणं, अर्थात सक्रिय असणाऱ्या बॅटरी, फ्यूल टँक किंवा तत्सम गोष्टी पृथ्वीच्या कक्षेपासून हटवणं. अन्यथा Kessler Syndrome मुळं भविष्यातील उपग्रह प्रक्षेपणात अडथळे निर्माण करून जागतिक स्तरावर यामुळं अनेक अडचणी निर्माण होतील.