Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्तहानी झाली. आता कुठे हे देश चर्चा करण्याच्या टप्प्यावर आल्याची चिन्हं असतानाच एकाएकि रशियानं आपला मोर्चा भलत्याच देशाकडे वळवल्याचं म्हटलं जात आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सध्या राजनैतिक मुद्द्यांच्या अभ्यासकांची चिंता रशियाच्या या कृतीमुळं वाढली असून, जगातील सर्वात आनंदी देश अशी ओळख असणाऱ्या फिनलँडला रशियाच्या सैन्यानं वेढा घातल्याचं पाहायला मिळत आहे. नव्यानं समोर आलेल्या आणि उपग्रहांच्या माध्यमातून टीपण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये रशियन सैन्याची ही चाल समोर आली आहे.
समोर आलेल्या या फोटोंमघ्ये फिनलँडच्या पूर्वेकडील सीमेनजीक रशियन सैन्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. मॉस्को आणि किवमध्ये शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच रशियन सैन्यानं फिनलँडच्या सीमेपाशी तळ उभारले आहेत. SVT from Planet Labs या स्विडीश माध्यमानं जारी केलेल्या छायाचित्रांमुळं आता जागतिक स्तरावर हा चिंतेचा मुद्दा असल्याचं स्पष्ट होत आहे.
हेल्सिंकी टाईम्सच्या वृत्तानुसार जारी करण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये सैन्यदलांच्या हालचाली, त्यांचे तळ, तात्पुरत्या सवरुपातील बांधकामं आणि लढाऊ विमानं तैनात झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये हेलिकॉप्टर, नवे तंबू आणि तळ आणि बॉम्बहल्ले करणारी क्षेपणास्त्र तैनात करण्यात आल्याचं उघड होत आहे.
अद्यापही फिनलँड किंवा रशियाकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं असलं तरीही जगभरातील महत्त्वाच्या देशांचं लक्ष मात्र या मुद्द्याकडे वेधलं असून रशियन सैन्यानं प्रामुख्यानं Kamenka मधील Karelian Isthmus, Petrozavodsk, Severomorsk-2 आणि Olenya या चार महत्त्वाच्या भागांमध्ये हालचाली सुरू केल्या आहेत.
फिनलँडच्या सीमाभागापासून Kamenka हा भाग 60 किमी अंतरावर असून या भागात फेब्रुवारीपासून रशियान सैन्याचे जवळपास 130 सैन्यदलाचे तंबू ठाण मांडून आहेत तर, सीमेपासून साधारण 175 किमी अंतरावरील भागामध्ये रशियानं तीन गोदानं उभारली असून, त्यामध्ये लष्करी कारवाईसाठीची जवळपास 50 वाहनं ठेवण्याची सोय आहे.
नाटोचा विस्तार होत आहे त्या धर्तीवर आम्ही आमच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची पावलं उचलू असा इशारा रशियानं आधीच दिला होता. त्यानुसारच सीमारेषेवर या हालचाली पाहायला मिळत आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 2023 पासून फिनलँड नाटोच्या यादीत सहभागी झाला होता. त्यामुळं आता नेमकं या दोन्ही देशांच्या सीमांवर काय परिस्थिती आहे आणि हा तणाव नेमका कोणत्या दिशेनं जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.