Marathi News> विश्व
Advertisement

प्राचीन शीव मंदिरावरुन दोन बौद्धबहुल देश भिडले; F-16 जेट्स तैनात, तोफांचा मारा अन्... जगाचं टेन्शन वाढवणारी बातमी

Thailand Combodia Border Clash: एका शिव मंदिरावरुन आशियामधील दोन बौद्धबहुल देश एकमेकांसमोर उभे ठाकले असून थेट एकमेकांच्या सीमांमध्ये त्यांनी हल्लेच सुरु केले आहेत. आशिया खंडाचं टेन्शन वाढवणारा हा वाद आहे तरी काय? पाहूयात सविस्तरपणे...

प्राचीन शीव मंदिरावरुन दोन बौद्धबहुल देश भिडले; F-16 जेट्स तैनात, तोफांचा मारा अन्... जगाचं टेन्शन वाढवणारी बातमी

Thailand Combodia Border Issue: आज भारताच्या शेजारील थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे. कंबोडियाने थायलंडवर रॉकेट आणि तोफांचा मारा केला आहे. थायलंडच्या सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी F-16 जेट विमानांचा वापर केल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा वादावरून मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तणावाचं गुरुवारी संघर्षात रूपांतर झालं. या प्राथमिक संघर्षामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एका मुलासह किमान नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.

थायलंडमधील सुरिन आणि कंबोडियातील ओडर मीन्चे प्रदेशाला लागून असलेल्या सीमेवरील दोन मंदिरांजवळ ही लढाई सुरू झाली. दोन्ही देशांनी समोरच्या पक्षाकडून संघर्षाला सुरूवात झाल्याचा दावा करत एकमेकांना दोष देण्याचा प्रयत्न केल्याचं सध्या तरी दिसत आहे.

थायलंड-कंबोडिया संघर्षाबद्दल आतापर्यंत नेमकी काय माहिती समोर आली आहे:

(FAQ About Thailand Combodia Clash)

नेमका वाद काय आहे?

(What Is The Conflict Between Thailand And Cambodia)

> थायलंड आणि कंबोडिया एमराल्ड ट्रँगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या एका ठिकाणी या दोन्ही देशांबरोबरच लाओसच्या सीमा एकत्र येतात.  या भागामध्ये अनेक प्राचीन मंदिरं आहेत.

> हा वाद अनेक दशकांपासून सुरू असून १५ वर्षांपूर्वी रक्तरंजित संघर्ष झालेला. यंदाच्या मे महिन्यात पुन्हा एकदा रक्तरंजित लष्करी संघर्षाचा भडका उडला आहे.

> 118 वर्षांहून अधिक काळापासून थायलंड आणि कंबोडिया त्यांच्या 817 किलोमीटरच्या भू-सीमेवरील विविध मतभेदांवरुन आणि आपआपल्या सार्वभौमत्वावरुन वाद घालत आहेत. या वादामुळे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी बऱ्याच चकमकी झाल्या आहेत. 2011 मध्ये आठवडाभर चाललेल्या तोफांच्या चकमकीसह किमान 12 जणांचे मृत्यू झालेले.

> याच वर्षी मे महिन्यात एका गोळीबाराच्या घटनेमध्ये एका कंबोडियन सैनिकाच्या मृत्यूनंतर पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. आता या तणावचं रुपांतर एका मोठ्या राजनैतिक संकटात झालं असून दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली आहे.

अलीकडील संघर्ष कशामुळे झाला?

(What's behind the clash between Thailand and Cambodia)

> थायलंडच्या लष्करी गस्तीवर असलेले पाच सदस्य भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झाल्यानंतर थायलंडने कंबोडियन राजदूताला हद्दपार केलं. त्यानंतर थायलंडने कंबोडियामधून स्वतःच्या राजदूताला परत बोलावलं. पुढल्या काही तासांत गुरुवारचा हिंसाचार झाला. वादग्रस्त भागात अलीकडेच टाकलेल्या भूसुरुंगात एका आठवड्याच्या कालावधीत दुसऱ्या थाई सैनिकाला हातपाय गमवावा लागला असल्याचा आरोप थायलंडने केला होता.

> थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी, "थायलंडच्या लष्कराने केलेल्या चौकशीत कंबोडियाने वादग्रस्त सीमावर्ती भागात नवीन भूसुरुंग पेरल्याचे पुरावे सापडले आहेत," असा दावा केला.  हा दावा कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह मधून नाकारण्यात आला आहे.

> गुरुवारी सकाळी कंबोडियाने, थायलंडबरोबरचे संबंध 'सर्वात खालच्या पातळीवर' आणण्यात आले आहेत, असं जाहीर केलं. थायलंडच्या एका राजदूताशिवाय सर्व राजदूतांना बाहेर काढत असून सर्व थाई समकक्षांना नोम पेन्ह या देशाच्या राजधानीमधून बाहेर काढत आहे, असं कंबोडियाने स्पष्ट केलं. 

> मागील काही आठवड्यांमध्ये दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी चकमकी झाल्या. थायलंडने आता कंबोडियाची सीमा ओलांडण्यावर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे कंबोडियाने काही वस्तूंची आयात थांबवली आहे.

सध्या काय चालले आहे? जाणून घ्या 7 महत्त्वाचे मुद्दे

(What Is Currently Happening In Thailand and Cambodia)

1) सकाळी 7:35 वाजता (00.35जीएमटी, भारतीय वेळेनुसार सहा) वाजता ता मुएन मंदिराचे रक्षण करणाऱ्या एका तुकडीने कंबोडियन ड्रोनचा आवाज ऐकला तेव्हा चकमकीला सुरूवात झाली, असा दावा थायलंडच्या लष्कराने केला आहे.  "नंतर, रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड घेतलेल्या जवानाबरोबर सहा सशस्त्र कंबोडियन सैनिक थाई चौकीसमोरील काटेरी तारांच्या कुंपणाजवळ आले," असं थाई सैन्याने सांगितले. थाई सैनिक त्यांना इशारा देण्यासाठी ओरडले, असे लष्कराने सांगितले. मात्र सकाळी 8.20 च्या सुमारास, कंबोडियन सैन्याने मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस, थाई तळापासून सुमारे 200 मीटर अंतरावर गोळीबार केला.

2. कंबोडियाने थायलंडकडून आमच्या "प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन" करण्यात आलं आहे असा आरोप केला. कंबोडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, थायलंडचे हवाई हल्ले 'विनाकारण' करण्यात आलेले असं म्हटलं आहे. तसेच कंबोडियाने त्यांच्या शेजारचा देश असलेल्या थायलंडला आपले सैन्य मागे घेण्याचे आणि "परिस्थितीनुसार वाढवू शकणाऱ्या कोणत्याही पुढील चिथावणीखोर कृतींपासून दूर राहण्याचे" आवाहन केले आहे.

कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या माली सोचेता यांनी, "थाई सैन्याने देशाच्या सार्वभौम प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या कंबोडियन सैन्यावर सशस्त्र हल्ला करून कंबोडिया राज्याच्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले आहे," असा गंभीर आरोप केला. "प्रतिसाद देण्यासाठी कंबोडियन सशस्त्र दलांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, थाई घुसखोरी परतवून लावण्यासाठी आणि कंबोडियाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षणाचा त्यांचा कायदेशीर अधिकार वापरला," असे निवेदनात म्हटले आहे.

3. थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने, कंबोडियन सैन्याने गुरुवारी सकाळी थाई लष्करी तळावर 'तो फांनी जोरदार गोळीबार केला आणि रुग्णालयासह नागरी भागांना देखील लक्ष्य केले, ज्यामुळे नागरिकांचे बळी गेले, असा दावा केलाय.

एएफपीच्या वृत्तानुसार, कंबोडियन तोफेचा गोळा सीमेवरील एका घरावर आदळला. या हल्ल्यात एक नागरिक ठार झाला आणि पाच वर्षांच्या मुलासह तीन जण जखमी झाले, असा आरोप थायलंडच्या सरकारच्या प्रवक्त्यांनी केला आहे. दरम्यान, कंबोडियावर "अमानवीय, क्रूर आणि युद्धाला बळी पडलेला देश" असल्याचा आरोप थायलंडने केला आहे.

4. गुरुवारी एका थाई एफ-16 लढाऊ विमानाने कंबोडियातील लक्ष्यांवर बॉम्बहल्ला केला, असे दोन्ही बाजूंनी सांगितले. वादग्रस्त सीमेवर तैनात करण्यात आलेल्या आणि थायलंडने तयार केलेल्या सहा एफ-१६ लढाऊ विमानांपैकी एका विमानाने कंबोडियात गोळीबार केला आणि एक लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त केले, असे थायलंडच्या सैन्याने म्हटले आहे.

5. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने, "विमानांनी रस्त्यावर दोन बॉम्ब टाकले. आम्ही "कंबोडियाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेविरुद्ध थायलंडच्या बेजबाबदार आणि क्रूर लष्करी आक्रमणाचा तीव्र निषेध करतो."

6. कंबोडियन पंतप्रधान हुन मानेट यांनी तसेच त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने, 'अनावश्यक लष्करी आक्रमण' असं या हल्ल्याला म्हटलं आहे. या हल्ल्याकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीने बैठक बोलावण्याची विनंतीही हुन मानेट यांनी केली आहे.

7. थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या सर्व सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. सीमेजवळच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

शीव मंदिराजवळ झटापट

(What Is Preah Vihear Temple Issue?)

विशेष म्हणजे थायलंड आणि कंबोडियामधील ताजी झटापट एका हिंदू मंदिराजवळ (ता मुएन थॉम) झाली आहे. हे एक प्राचीन शिव मंदिर आहे. दोन्ही बौद्ध बहुसंख्य देश एका हिंदू मंदिरासाठी एकमेकांविरुद्ध लढण्यास तयार असल्याचं चित्र दिसत आहे.

थायलंड-कंबोडिया वादात हे मंदिर चर्चेत असण्याचं कारण काय?

प्राचीन प्रेह विहार मंदिर थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर बांधलेलं आहे. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर एक हजारहून अधिक वर्ष जुने आहे. हिंदू मंदिरावरील ताबा सांगण्यावरुनच दोन देश एकमेकांना भिडल्याचं सांगितलं जात आहे. एका टेकडीवर बांधलेल्या या मंदिराचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे. तथापि  आता थायलंड या मंदिराच्या सभोवतालच्या जमिनीवर आपला हक्क सांगतो. 7 जुलै 2008 रोजी प्रेह विहार मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला. त्यानंतर, मंदिरावरून कंबोडिया आणि थायलंडमधील वाद वाढला. अखेर 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला.

सध्याच्या संघर्षाचा परिणाम काय झाला?

सीमा वादामुळे थायलंडमध्ये देशांतर्गत राजकीय संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा यांना त्यांच्या वर्तनाची नैतिक चौकशी होईपर्यंत पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

कंबोडियाच्या बाजूने पेटोंगटार्न आणि हुन सेन यांच्यातील राजनैतिक संवाद समोर आला आहे, ज्यामुळे न्यायालयीन चौकशी सुरू झाली.

गेल्या आठवड्यात, हुन मानेट यांनी घोषणा केली की, कंबोडिया पुढील वर्षी नागरिकांना सैन्यात भरती करण्यास सुरुवात करणार आहे. दीर्घकाळ निष्क्रिय असलेला लष्करी भरतीसंदर्भातील अनिवार्य मसुदा कायदा सक्रिय करण्यात येणार आहे.

Read More