Marathi News> विश्व
Advertisement

'तुम्हाला युद्धच हवं असेल तर...', चीनची अमेरिकेला Warning; जग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर?

US China Trade War: ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरुन चीनने अमेरिकेला खडे बोल सुनावताना थेट इशाराच दिला आहे.

'तुम्हाला युद्धच हवं असेल तर...', चीनची अमेरिकेला Warning; जग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर?

US China Trade War: चीनमधून फेन्टानिल या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याचा आरोप करत अमेरिकेने चीनवर आयातशुल्क वाढवले आहे. यानंतर चीननेही अमेरिकेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले. तुम्हाला युद्ध हवंय, मग आम्ही त्यासाठी तयार आहोत, असं थेट आव्हानच चीनने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृ्वाखालील अमेरिकेला दिलं आहे. 

...तर आम्ही शेवटपर्यंत ते युद्ध छेडण्यासाठी तयार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, ब्राझील आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर ‘टॅरिफ’ (आयातशुल्क) लादले आहे. यावर आता चीनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुम्हाला व्यापार युद्ध छेडायचे असेल तर ते शेवटपर्यंत लढण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा चीनने दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी 'एक्स'वर सविस्तर पोस्ट केली आहे. “जर अमेरिकेला टॅरिफ वाढवून व्यापार युद्ध किंवा इतर कोणत्या प्रकारचे युद्ध छेडायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत ते युद्ध छेडण्यासाठी तयार आहोत,” असं चिनी प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 

चीनचा थेट अमेरिकेला उघड इशारा

अमेरिकेने चिनी मालावर फेब्रुवारीमध्ये 10 टक्के कर लागू केला होता, तो 4 मार्चपासून 20 टक्के इतका झाला असून प्रत्युत्तरादाखल चीनने विविध प्रकारच्या अमेरिकी मालांवर 15 टक्के आयातशुल्क लादण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता चीनने थेट अमेरिकेला उघड इशारा दिला आहे. 

फेन्टानिलची प्रयोगशाला कॅनडात असल्याचा अमेरिकेचा दावा

अमेरिकेत फेन्टानिलच्या अतिसेवनामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. अमेरिकेत फेन्टानिल या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते.  ही रसायने चीनमधून येतात, तर मेक्सिकन टोळ्या बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा करतात. तर कॅनडामध्ये फेन्टानिलच्या प्रयोगशाळा आहेत, असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे.

...म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली जात आहे का?

फेन्टानिल हे अमेरिकेचच पाप असल्याचंही चीनने म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, फेन्टानिलचे संकट हे अमेरिकेचेच पाप आहे. आमच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याऐवजी अमेरिकेने आमच्यावरच दोषारोप लावले आहेत. आयातशुल्क वाढवून चीनवर दबाव आणण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांची मदत केली म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली जात आहे का? असा सवाल चीनने उपस्थित केला आहे. 

धमक्यांना आम्ही भीक घालत नाही

ट्रम्प प्रशासनाला रोखठोक प्रत्युत्तर देताना चीनने म्हटले की, "आयातशुल्क वैगरे वाढवून चीनला धमकावता येणार नाही." फेन्टानिलची समस्या सोडवायची असेल तर तुम्हाला राष्ट्रांना समान वागणूक द्यावी लागेल, असेही चीनने अमेरिकेला सुनावलं आहे. चीनच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले, “अमेरिकेच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही." एवढ्यावरच न थांबता, "दबाव टाकणे किंवा धमकावणे हा चीनशी व्यवहार करण्याचा योग्य मार्ग ठरणार नाही," असंही चीनने स्पष्ट केलं. 

जगावर परिणाम

या दोन्ही देशांमध्ये व्यापर युद्ध झालं तर त्याला मोठा आर्थिक फटका जगातील सर्वच देशांना बसू शकतो. हे दोन्ही देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. जागतिक व्यापार युद्धामुळे सर्वच शेअर बाजारांना फटका बसण्याबरोबरच तेलाचे दरही वाढू शकतात. त्यामुळे याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसू शकतो

Read More