US Oil Deal with Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे भारतावर 25 टक्के आयात शुल्क लादलं असताना, दुसरीकडे पाकिस्तानसह सर्वात मोठ्या तेल कराराची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमधील तेल साठे विकसित करणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल असा दावाही केला आहे. बुधवारी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
"आम्ही पाकिस्तानसोबत एक करार केला आहे, ज्याअंतर्गत अमेरिका आणि पाकिस्तान मिळून तेथील विशाल तेल साठ्यांचा विकास करेल. एक तेल कंपनीची या भागीदारीसाठी निवड केली जाईल. कदाचित एक दिवस ते भारतालाही तेल विकतील," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारतावर 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या सागरी सीमेवर तेल आणि गॅसचा मोठा साठा सापडला होता. पाकिस्तानधील वृत्तसंस्था डॉनच्या माहितीनुसार, एका मित्र देशाच्या सहकार्याने या भागात 3 वर्षे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर तेल आणि गॅसच्या साठ्याची पुष्टी झाली.
काही रिपोर्ट्सनुसार, हा साठा जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल आणि गॅसचा साठा आहे. सध्या व्हेनेझुएलामध्ये सर्वात मोठा तेल साठा आहे, जिथे 34 लाख बॅरल तेल आहे. त्याच वेळी, अमेरिकेत सर्वात शुद्ध तेलाचे साठे आहेत, जे अद्याप वापरले गेले नाहीत.
अहवालानुसार, साठ्यांशी संबंधित संशोधन पूर्ण करण्यासाठी सुमारे 42 हजार कोटी रुपये खर्च येईल. त्यानंतर, समुद्राच्या खोलीतून ते काढण्यासाठी 4 ते 5 वर्षे लागू शकतात. जर संशोधन यशस्वी झाले तर तेल आणि गॅस काढण्यासाठी विहिरी बांधणं आणि इतर पायाभूत सुविधा बांधण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता असेल.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तेल आणि वायूच्या साठ्यांचा शोध हा देशाच्या 'ब्लू वॉटर इकोनॉमी' चांगला असल्याचे वर्णन केले आहे. समुद्री मार्ग, नवीन बंदरे आणि सागरी धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देण्याला ब्लू इकॉनॉमी म्हणतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लागू करणार असल्याची घोषणा बुधवारी केली. तसंच रशियाकडूनो मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल दंडदेखील होणार असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान दंड किती असेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला आहे. कारण त्यांचे आयातशुल्क खपू जास्त आणि जगात सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि वाईट गैर-मौद्रिक व्यापार अडथळे आहेत".
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "भारताने नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमध्ये होणारी हत्या थांबवावी असं वाटते. सर्व गोष्टी चांगल्या नाहीत. म्हणून भारत 1 ऑगस्टपासून 25 टक्के आयातशुल्क आणि वर दिलेल्या कारणांसाठी दंड भरेल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! अमेरिकेला पुन्हा महान बनवूयात".
ऑटोमोबाईल्स, ऑटो कंपोनेंट्स, स्टील, अॅल्युमिनियम, स्मार्टफोन्स, सोलर मॉड्यूल्स, सागरी उत्पादने, रत्ने आणि दागिने आणि निवडक प्रक्रिया केलेले अन्न आणि कृषी उत्पादने हे सर्व 25 टक्के करांच्या यादीत समाविष्ट आहेत. तथापि, औषधनिर्माण, सेमीकंडक्टर आणि महत्त्वपूर्ण खनिजे वगळण्यात आली आहेत.