US President Donald Trump Volodymyr Zelensky video viral : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. शुक्रवारी पार पडलेली ही बैठक काही अंशी तणावपूर्ण वातावरणातच पार पडल्याचं स्पष्ट झालं आणि यास कारण ठरलं ते म्हणजे या भेटीदरम्यान ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये झालेली शाब्दीक बाचाबाची.
चर्चेनं सुरू झालेल्या या बैठकीला ट्रम्प यांनी झेलेन्स्कींवर आवाज चढवताच तणावाचं वळण मिळालं. गोष्टी इतक्या बिघडल्या की, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना तातडीनं व्हाईट हाऊसमधून निघण्यास सांगितलं गेलं. सोशल मीडियावर या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात यामुळं अनेक चर्चांनाही वाव मिळाला.
अमेरिकेतील व्हाईट हाऊस इथं शुक्रवारी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात बैठकीदरम्यान टोकाचा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं आता रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला अमेरिकेची मदत मिळणं जवळपास अशक्यच असल्याचा तर्क सध्या लावला जात आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यासाठी अपेक्षित कृतज्ञता न दर्शवल्यानं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी झेलेन्स्कींवर या बैठकीदरम्यान आगपाखड केली.
'तुम्ही लाखोंच्या जनसमुदायाच्या आयुष्याशी खेळत आहात. तिसऱ्या महायुद्धाचाही तुम्ही जुगार मांडला आहे. तुमच्या कृती देशाचा अपमान करणाऱ्या असून, तुमचा देश सध्या मोठ्या संकटात आहे. तुम्ही हे युद्ध नाही जिंकणार. या परिस्थितीतून बाहेर पडण्याची चांगली संधी तुम्हाला आहे', असं ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना चढ्या स्वरातच सांगितलं. त्यावर त्यांनी मात्र आपण कोणत्याही तडजोडीस तयार नसल्याची ठाम भूमिका मांडताच ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष युक्रेनच्या सर्वोच्च प्रतिनिधीवर बरसले. या वादग्रस्त बैठकीनंतर व्हाईट हाऊसच्या वतीनं X पोस्ट करत, "त्यांनी अमेरिकेच्या प्रिय ओव्हल ऑफिसमध्ये त्यांचा अनादर केला. जेव्हा ते शांततेसाठी तयार असतील तेव्हा ते परत येऊ शकतात." - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.
“We had a very meaningful meeting in the White House today. Much was learned that could never be understood without conversation under such fire and pressure. It’s amazing what comes out through emotion, and I have determined that President Zelenskyy is not ready for Peace if… pic.twitter.com/CtnqXBNcW3
— President Donald J. Trump (@POTUS) February 28, 2025
रशियामवेत सामंजस्य कराराच्या वाटेत ते अडथळा होऊन उभे आहेत अशा शब्दांत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्यानं बैठकीनंतर नेमकं काय घडलं, याबाबतचा तपशील जाहीर केला. सदर बैठकीनंतर दोन्ही नेते वेगवेगळ्या कक्षांमध्ये गेले आणि ट्रम्प यांनी युक्रेनच्या प्रिनिधींसह झेलेन्स्कींना व्हाईट हाऊसमधून निघून जाण्यास सांगितलं. सदर बैठक अशा पद्धतीनं सोडू न देण्याचा मनसुबा असणाऱ्या युक्रेनच्या प्रतिनीधींनी मात्र या परिस्थितीतही चर्चेसाठी तयारी दाखवली. वातावरण इतक्या गंभीर वळणावर पोहोचलं की, दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. ज्यानंतर काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी न करताच झेलेन्स्की तिथून निघून गेले.