Marathi News> विश्व
Advertisement

तब्बल 330 लाख कोटी रुपयांची राखरांगोळी; आर्थिक मंदीचे संकेत मिळताच शेअर बाजारात शुकशुकाट, गुंतवणूदारांना फटका

US Stock Market:  शेअर बाजारातील सर्वात मोठी पडझड. स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणारे सर्व झाले सतर्क. आताच्या क्षणाची आणि पैशांवर परिणाम करणारी महत्त्वाची बातमी... 

तब्बल 330 लाख कोटी रुपयांची राखरांगोळी; आर्थिक मंदीचे संकेत मिळताच शेअर बाजारात शुकशुकाट, गुंतवणूदारांना फटका

US Stock Market: कैक दिवसांपासून जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे अनेक संकेत मिळत असतानात आता (Share Market) शेअर बाजारातील उलथापालथीमुळे पुन्हा एकदा सारं जग आर्थिक संकटाच्या गर्त छायेत बुडणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आयातशुल्कात (टॅरिफ) वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता गुंतवणुकदारांना धक्का बसला आहे. इतकंच नव्हे तर, खुद्द ट्रम्प यांनाच त्यांच्या या निर्णयाचा फटका बसत असल्याची वस्तुस्थिती सध्या नाकारता येत नाही. 

गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्यानं शेअर बाजारात सुरू असणारी पडझड आता गंभीर वळणावर पोहोचली असून, टॅरिफ पॉलिसीमध्ये असणाऱ्या अनिश्चिततेमुळं जागतिक आर्थिक मंदीची शक्यता वाढली आहे. खुद्द ट्रम्प यांनीही या शक्यतेला दुजोरा दिल्यामुळं अमेरिकेतील शेअर बाजार धाडकन कोसळला. इथं डाऊ जोंसपासून एसअँडपीपर्यंत बऱ्याच इंडेक्सचं अस्तित्वं धोक्यात आलं. मागील दोन वर्षांमधील सर्वात मोठं निच्चांकी सत्र यावेळी अमेरिकेत नोंदवण्यात आलं. 

यामध्ये S&P 500 इंडेक्‍स 2.7% सह सप्टेंबरनंतर सर्वात कमी स्तरावर बंद झाला आणि यावेळची आकडेवारी होती 5,614.56 अंक. ही एकंदर पडझड पाहता एसअँडपी 500 च्या रेकॉर्ड स्तरापासून 4 ट्रिलियन डॉलर म्हणजेच साधारण 330 लाख कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेचं नुकसान नोंदवण्यात आलं. 

इथं शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळत असतानाच तिथं ज्या वॉल स्ट्रीटवर ट्रम्प यांच्या निर्णयांचं स्वागत करण्यात आलं तिथं आता मात्र त्याच्या नव्या योजनांनी गुंतवणूकदार, ग्राहक आणि बड्या व्यावसायिकांच्या मनात अनिश्चिततेच्या सावटामुळं अनेक प्रश्नांनी आणि आर्थिक विवंचनांनी घर केलं आहे. अमेरिकेतील या सर्व गणितांचा थेट परिणाम आशियाई अर्थकारणावरही दिसून येत असून, मंगळवारीसुद्धा शेअर बाजाराची सुरुवात झाली तेव्हाही सरासरी आकडेवारीवर 'लाल' खूण जारी करण्यात आली होती. 

हेसुद्धा वाचा : 'अर्धनग्न पुरुष आणि तोकड्या कपड्यांतील महिला...' गुलमर्ग फॅशन शोमुळं नवा वाद; काय आहे नेमकं प्रकरण? 

भारतातील शेअर बाजारातही अमेरिकी शेअर बाजाराच्या पडझडीचे पडसाद उमटले. (India Stock Market) सोमवारी निफ्टी आणि सेन्सेक्स कमी अंकावर बंद झाले असून तिथंही लाल खूण सातत्यानं पाहायला मिळाली. त्यामुळं भारतीय बाजारपेठांमध्येसुद्धा गुंतवणूकदार सध्या विचारपूर्वक गुंतवणूक करत असून, कोणताही मोठा धोका पत्करण्याचं धाडस मात्र कोणीही करताना दिसत नाहीय. 

ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळं जगभात 'ट्रेड वॉर' सुरू झालं असून अमेरिकेप्रमाणंच इतरही राष्ट्रांनी टॅरिफ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं जागतिक स्तरावर महागाईचा उच्चांक गाठला जाण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. वाढती महागाई आणि जागतिक आर्थिक मंदीमध्ये आता शेअर बाजारात नेमक्या काय घडामोडी घडतात यावरच गुंतवणूकदारांचं भवितव्य अवलंबून आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

Read More