Annabelle Doll : चित्रपटांमुळं चर्चेचा विषय ठरणारी एक बाहुली सध्या पुन्हा एकदा जगभरात सर्वांचं लक्ष वेधत आहे. अॅनाबेल असं तिचं नाव..... काही लक्षात येतंय का? 'द कॉन्ज्यूरिंग' या चित्रपटाच्या सीरिजमुळं चर्चेत आलेली हीच ती 'अॅनाबेल'.
हल्लीच प्रत्यक्षातील ही बाहुली नेहमीच्या जागी नसून कुठेतरी दिसेनाशी झाल्याची अर्थात ही बाहुली गायब झाल्याची चर्चा जोर धरू लागली होती. ज्यानंतर आता याच बाहुलीसंदर्भातील आणखी एक माहिती खुद्द वॉरेन ऑकल्ट म्यूझियम (Warren Occult Museum) चे संचालक टोनी स्पेरा यांनी देत अॅनाबेल कधीच तिच्या मूळ जागेवरून दिसेनाशी झालीच नाही असं सांगितलं.
हल्लीच या बाहुलीला अमेरिकेतील विविध ठिकाणांवर काही अनपेक्षित घचनांदरम्यान नेण्यात आलं होतं. मात्र यादरम्यान सर्व ठिकाणी संरक्षणात्मक उपायांचासुद्धा अवलंब करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
बाहुलीच्या या दौऱ्यादरम्यान न्यू ऑरलियन्स इथं एका ऐतिहासिक वृक्षलागवड कार्यक्रमादरम्यान आग लागल्याची आणि कैद्यांनी कारागृहातून पळ काढल्याची घटना घडल्याचं म्हटलं गेलं. मात्र या अफवा ठरल्या. काहींनी या अफवांना बाहुलीच्या उपस्थितीशी जोडू पाहत ही अशुभसूचक घटना असल्याचंच म्हटलं होतं. स्पेराच्या माहितीनुसार या बाहुलीला स्थलांतरित करण्यापूर्वी आणि स्थलांतरित केल्यानंतर कॅथलिक पादरीद्वारा अभिमंत्रित करण्यात आलं होतं. याशिवाय ही बाहुली एका विशिष्ट पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या लाकडी बॉक्समध्ये ठेवण्यात आली. या बॉक्सवर ख्रिस्त धर्मातील क्रॉस प्रतिकाचाही वापर करण्यात आला होता.
Annabelle बाहुली गायब झाल्याची अफवा उठण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा सोशल मीडियावर या अशा अफवांनी डोकं वर काढलं होतं. मात्र प्रत्यक्षात असं काहीही घडलं नसल्याची बाबही कालांतरानं स्पष्ट करण्यात आली.
Annabelle ही एक रेग्डी एन डॉल असून त्या बाहुलीला पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर्स एड आणि लॉरेन वॉरेन यांनी 1970 मध्ये या बाहुलीला ताब्यात घेतलं होतं. ही बाहुली दुष्ट शक्तींनी प्रभावित असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र सध्याच्या घडीला ही बाहुली वॉरेन ऑकल्ट संग्रहालयात संरक्षित असल्याचच सांगितलं जात आहे.
(वरील माहिती सोशल मीडियावरील चर्चा आणि उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास अशा कोणत्याही वृत्त अथवा घटनेची खातरजमा करत नाही.)