Citigroup Account Bank News : एखादा व्यवहार करत असताना त्यामध्ये अनावधानानं काही चुका होतात आणि ही अतिशय सर्वसामान्य बाब ग्राह्य धरली जाते. पण, सराईतांकडून अशा चुका झाल्यास मात्र अनेकांच्याच भुवया उंचावतात. कारण, जो हिशोब सवयीचा भाग असतो तोच नेमका कसा बरं चुकतो? हाच प्रश्न इथं उपस्थित होतो. सध्या अशाच एका गल्लतीची चर्चा सुरू असून आर्थिक व्यवहारामध्ये झालेला हा घोळ नेमका झालाच कसा? हाच प्रश्न राहून राहून विचारला जात आहे.
हे प्रकरण सिटीग्रुपशी संबंधित असून, इथं चुकून एका ग्राहकाच्या खात्यात चक्क 81 ट्रिलियन डॉलर (7,08,51,14,55,00,00,000 रुपये) जमा झाले आणि हा आकडा पाहून तो वाचणं दूर काय प्रतिक्रिया द्यावी हेच ग्राहकाला कळेनसं झालं. प्रत्यक्षात या ग्राहकाच्या खात्यात बँकेकडून अवघे 280 डॉलर म्हणजेच (24,492 रुपये) येणं अपेक्षित होतं. पण, प्रत्यक्षात मात्र चुकीची आणि इतकी मोठी रक्कम खात्यात जमा झाली की पाहणारे हैराण झाले. बँकेच्याच एका जुन्या तांत्रिक अडचणीमुळे ही मोठी चूक झाली असून, बराच काळ ती सुधारण्यातही आली नव्हती.
Financial Times च्या वृत्तानुसार साधारण वर्षभरापूर्वीच्या या प्रकरणामध्ये एका बँकेनं कर्मचाऱ्यांच्या पगाराची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेला एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मंजुरी मिळणं अपेक्षित होतं. पण, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब निसटली आणि जवळपास दीड तासानंतर एका तिसऱ्याच बँक कर्मचाऱ्यानं अकाऊंटमधील जमा रकमेवर नजर टाकताच त्यांना तिथं काहीतरी गोंधळ दिसून आला आणि घडला प्रकार उघडकीस आला.
काही तासांमध्ये बँकेनं हे transaction रिवर्स करत अधिकृत माहितीसुद्धा जारी करण्यात आली. बँकेच्या माहितीनुसार योग्य वेळी या व्यवहाराची माहिती मिळाली आणि ही चूक सुधारण्यात आली. बँकेनं केलेल्या दाव्यानुसार अंतर्गत प्रणाली सुरळीत काम कत असून, पैसे बँकेबाहेर गेलेले नाहीत. परिणामी ग्राहक किंवा बँकेपैकी कोणाचंही यामध्ये नुकसान झालेलं नाही. या सर्व प्रकारातून बँकेनं मानवी हस्तक्षेपानं होणाऱ्या कामांऐवजी आता ऑटोमेशनवर अधिक भर दिला जाणं आवश्यक असल्याची बाब अधोरेखित केली.
सिटीग्रुपमध्ये हा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नसून, याआधीसुद्धा 2023 मध्ये बँकेकडून अनेक व्यवहारामध्ये चुका झाल्याचं निदर्शनास आलं होतं. 2020 मध्ये या बँकेनं एका खात्यावर चुकून 900 मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम जमा केली होती. ज्यानंतर ही रक्कम मागे घेण्यासाठीसुद्धा बँकेनं प्रयत्न केले. या चुकीसाठी बँकेचे तत्कालीन सीईओ मायकल कॉर्बेट यांना पदत्याग करत एक मोठी रक्कम दंडस्वरुपात भरावी लागली होती.