Hajj 2025: हज यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू मक्का या ठिकाणी येत असतात. रविवारपर्यंत मक्का येथे आलेल्या यात्रेकरूंनची संख्या 14 लाखांवर गेली आहे. अजूनही काही यात्रेकरू येण्याची शक्यता आहे. मात्र, अशातच सौदी अरेबिया प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये यावर्षी हज यात्रेपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सौदी अरेबियाने सुमारे 2.7 लाख यात्रेकरूंना मक्कामध्ये प्रवेश नाकारला आहे. परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे येणाऱ्या यात्रेकरूंना रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा जीवितहानी होणार नाही.
त्यामुळे हज यात्रेकरूंच्या मक्का प्रवेशावर निर्बंध घालण्याच्या हालचालीला अनधिकृत प्रवेशावरील व्यापक कारवाईचा एक भाग म्हटलं जात आहे. असं वृत्तसंस्था एपीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
...तर 4 लाख रुपयांचा दंड आणि कठोर शिक्षा
गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये हज येथे उष्णतेमुळे झालेले मृत्यू लक्षात घेता यावेळी सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेला मोठ्या प्रमाणात सुरक्षित ठेवण्यासाठी पाऊले उचलली आहे. सौदी सरकारने गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे हजमध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरुंमुळे अनेक जीव गेल्याचं म्हटलं आहे. अशातच यावर्षी परवानगीशिवाय हजमध्ये सहभागी होण्यासाठी 5 हजार डॉलर्स म्हणजेच 4 लाख रुपये दंड त्यासोबतच देशातून हद्दपार आणि इतर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आळी आहे.
सौदी अरेबिया सरकारने घेतलेला हा निर्णय इतर देशातील नागरिकांप्रमाणे तेथील स्थानिकांनाही लागू असणार आहे. मक्का येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अल-ओमारी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की, हजला येणारे यात्रेकरू आमच्या देखरेखीखाली असणार आहेत. जो कोणी नियम मोडेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे.
23 हजार लोकांवर कारवाई
दरम्यान, सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 हजारहून अधिक स्थानिक लोकांना हज नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा करण्यात आली आहे. तसेच 400 हज सेवा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी यावेळी हज यात्रे दरम्यान ड्रोन देखील तैनात केले जाणार आहेत.
हज हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे आणि प्रत्येक सक्षम मुस्लिमाने आयुष्यात किमान एकदा तरी तो करणे अनिवार्य मानले जाते. अलिकडच्या काळात खराब हवामान आणि मोठ्या गर्दीमुळे हजला जाणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे यावर्षी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.