World news : या विश्वात ज्या गोष्टीची उत्पत्ती होते त्या गोष्टी तिचा ऱ्हास अटळ असतो हा अलिखित नियमच आहे. हा नियम जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाला लागू आहे. हे वास्तव असलं तरीही सध्या मात्र पृथ्वीचच अस्तित्वं धोक्यात येत असून, विनाशपर्व आता फार दूर नाही हेच चित्रसुद्धा सध्या पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या एका लघुग्रहानं चिंता वाढवलेली असताना एकाएकी हे संकट शमताना दिसत असल्याची बाब शास्त्रज्ञांनी जाहीर केली आणि अनेकांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
हे संकट टळत नाही तोच आता आणखी एक संकट पृथ्वीच्या उंबरठ्यावर थबकल्याची माहिती समोर आली आहे. सातत्यानं होणारे हवामान बदल हे या संकटामागचं मुख्य कारण असून, या संकटाची चाहूल थेट ग्रीनलँडमधून लागली आहे. जिथं, बर्फाची एक विस्तीर्ण आणि असिमीत चादर वितळण्यास सुरुवात झाली आहे. हे संकट गंभीर वळणावर पोहोचल्यास संपूर्ण जगासाठीच विनाशपर्वाची सुरुवात होऊ शकते असं म्हटलं जात आहे.
अभ्यासकांच्या मते विक्रमी वेगानं हा बर्फ वितळत असून, ताशी साधारण 3.3 कोटी टन इतक्या प्रमाणात हा बर्फ पाण्यात रुपांतरित होत आहे. जागतिक स्तरावर तापमानात 2 अंशांची जरी वाढ झाली तरीही बर्फाची ही संपूर्ण चादर कोलमडून तिचं पाण्यात रुपांतर होईल. परिणामी समुद्राची पाणीपातळी सात मीटरनं वाढून त्यामुळं किनारपट्टी क्षेत्र पाण्याखाली जाऊ शकतात.
हवामान बदलांशी संबंधित नियतकालिक 'द क्रायोस्फीयर' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अध्ययनानुसार संशोधकांनी एक प्रकल्प तयार केला असून, त्या माध्मयातून विविध ठिकाणी विविध तापमानामुळं बर्फाच्छादित प्रदेशांवर नेमका कसा परिणाम होतो याचा आढावा घेता येतो. याच संशोधनातून समोर आलेल्या वृत्तानुसार जर दरवर्षी 230 गीगाटन बर्फ वितळला तर, ग्रीनलँडमधील बर्फाच्या चादरीचं कायमस्वरुपी नुकसान होणार असून, ती पूर्णपणे नाहीशी होऊ शकते.
ग्रीनलँड इथं असणारी ही बर्फाची चादर पृथ्वीवरील काही स्थायी बर्फाच्छादित प्रदेशांपैकी एक असून, असाच दुसरा प्रदेश म्हणजे अंटार्क्टिका. साधारण, 17 लाख वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रात विस्तारलेल्या या भागात एक मोठा जलसाठा आहे. पण, 1994 नंतरपासून ग्रीनलँड आणि अंटार्क्टीकातील बर्फाळ भागातून साधारण 6.9 ट्रिलियन टन बर्फ नष्ट झाला आहे. मानवी हस्तक्षेप, बदलतं हवामान आणि जागतिक तापमानवाढ ही यामागची मुख्य कारणं असल्याचं सांगत संशोधकांनी भविष्यातील संकटांची आताच चाहूल लागल्याचं स्पष्ट केलं आहे.
विविध कारणांमुळं होणारा हा ऱ्हास थांबवण्याच्या प्रयत्नांची सर्व धुरासुद्धा मानवाच्याच खांद्यांवर असून, जर कार्बन उत्सर्जनावर तातडीनं नियंत्रण आणलं तर बर्फाची चादर वितळण्याचा वेग कमी करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जाणं गरजेचं असून, शाश्वत उर्जेचा वापर, वृक्ष लागवड, पर्यावणात्मक धोरणांचा स्वीकार अशा गोष्टींचा टप्प्याटप्प्यानं स्वीकार करत एक मोठं ध्येय्य साध्य होऊ शकतं असा स्पष्ट इशारा संशोधकांनी दिला आहे. असं न केल्यास विध्वंस अटळ आहे, ही महत्त्वाची बाबही त्यांनी अधोरेखित केली असल्यानं साऱ्या जगासाठी ही एका मोठ्या संकटाची चाहूल आहे असं म्हणणं गैर नाही.